Add

Saturday, July 28, 2018

भारतीयांनो, ही विषवल्ली उखाडून काढलीच पाहिजे !

*भारतीयांनो, ही विषवल्ली उखाडून काढलीच पाहिजे !*

            या आठवड्याच्या प्रारंभी घडलेल्या दोन महत्वपुर्ण घटना देशाने पाहिल्या. एका घटणेत उत्तर प्रदेशातील बरेली येथील माैलवी कासमीने टिव्हीवर तीन तलाकवर लाईव्ह चर्चा सुरू असतानाच एका वकील महिलेला मारहाण केली. तर दुसरी घटना झारखंड राज्यातली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर्य समाजी स्वामी अग्निवेश यांना भाजपवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या दोन्हीही घटना गंभीर आहेत. मारहाण करणार्या दोन्हीही प्रवृत्ती धर्मांध आणि गुंड प्रवृत्तीच्या आहेत. माैलाना कासमी असेल किंवा वयोवृध्द अग्निवेश यांना बेदम मारहाण करणारी संघवादी  बांडगुळ असतील ही दोन्ही एकाच लायकीची आहेत. या दोघांचा या देशाला, देशाच्या लोकशाहीला धोका आहे. कट्टरतेच्या चिखलात फसलेला कासमी किंवा ही संघछाप पिलावळ यातले कुणीच देशाचे संविधान मानत नाहीत. त्यांना संविधानापेक्षा धर्माचे कायदे मान्य आहेत. धर्माचे राज्य मान्य आहे. जर त्यांच्या म्हणण्यानुसार या देशात धर्माचे राज्य अवतरले तर काय होवू शकते ? याचा उत्तम नमुणा म्हणजे वरील दोन्ही घटणा. या देशात हे दोन्ही धर्मांध माजले तर देशात कायद्याचे राज्य राहणार नाही. कारण एक सापनाथ आहे तर दुसरा नागनाथ आहे. हे दोघेही एकमेकांना पुरक आहेत, परस्परावलंबी आहेत. या दोन्हीही घटना चिंताजनक आहेत. दोन्ही घटना वेगवेगळ्या असतील, दोन्ही घटनांचे स्थळ, काळ व वेळ वेगळी असेल. पण या दोन्ही घटनांमधील प्रवृत्ती समानच आहे. एकाला दाढी होती, त्याची सुंता झालेली होती. तर दुसरे बिगर दाढीचे, सुंता  झालेली नसली तरी त्यांची संघ परिवाराने वैचारिक सुंता कधीच केलेली आहे. त्यांच्या मेंदूला जानव्याचा तिढा मारून मेंदूचा शेंडा काढला आहे किंवा मेंदूची वाढ थांबवली आहे म्हंटले तरी चालेल. त्यामुळे त्यांचे मेंदू विशिष्ठ मर्यादेच्या बाहेर चालत नाहीत.

      या दोन्ही प्रकरणातल्या व्यक्ती व त्यांचे धर्म वेग-वेगळे आहेत पण त्यांची प्रवृत्ती समानच आहे. दोघांचीही वृत्ती एकाच लायकीची. दोघांचाही भारतीयत्वाला धोका आहे. या दोन्ही प्रवृत्ती नव्हे तर विकृती आहेत. एक अल्लाच्या नावावर पोसलेले व दुसरे रामाचे नाव घेवून पोसलेले बांडगुळ आहे. या दोन्हीही बांडगुळांना भारतीय समाजाने मुळासकट उखाडून काढायला हवे. या विकृती माजल्या तर भारताचा अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. खरेतर हे दोघे मिळून धर्मांधतेचा हैदोस घालत असावेत. कारण दोघांचे अस्तित्व एकमेकांच्या द्वेषावर आधारीत आहे. सामान्य लोकांना भडकावण्यासाठी दोघेही एकमेकाचा उपयोग करतात. त्यामुळे दोघे मिळून अशा उचापती करत असावेत. असे करण्याने दोघांचेही महत्व आणि प्रस्थ वाढते आहे. दोघांचाही समाजात दबदबा राहतो आहे. कुठलाही धर्म महिला किंवा वयोवृध्दाला मारहाण करायला सांगत नाही. धर्माच्या व्याख्येत महिला व वयोवृध्द व्यक्ती दुबळ्या आहेत. त्यांच्यावर हात उचलणे न्यायाला किंवा धर्माला धरून होत नाही. पण तरीही या दोन्ही घटणेत मारहाण केलीच. धर्मांध माैलवीने महिलेला मारले तर दुसर्या घटणेत मस्तावलेल्या झुंडीने एकत्र येत एका वयोवृध्दाला मारले. भारतीय समाजाने या दोन्ही घटनांचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. ही विकृती भारतीय संस्कृतीत बसत नाही. हे मस्तावलेले नपुंसक दुबळ्या लोकांच्यावरच हात उचलतात. जे सबळ आहेत, तुल्यबळ आहेत त्यांच्या वाट्याला ही बांडगुळं जात नाहीत. रामाच्या नावाने हरामी करणारे पाकिस्तानात जात नाहीत. शत्रू देशाला जावून भिडत नाहीत. इथेच स्वकियांच्या उरावर बसतात. त्यांच्यावर हल्ले करतात, त्यांनाच मारहाण करतात. म्हणूनच भारतीय समाजाने वेळीच सावध होत या धर्मांध विषवल्ली मुळासकट उखाडून फेकल्या पाहिजेत. मग त्या हिंदू धर्मातल्या असोत अथवा मुस्लिम धर्मातल्या.
 
       काही दिवसापुर्वी अमेरिकेने संघाच्या वळचणीच्या काही संघटणांना दहशतवादी घोषित केलेले आहे. कासमी तर दहशतवादी प्रवृत्तीचा आहेच पण रामाचे नाव घेवून संघ छाप बांडगुळं दहशतवादाची विषवल्ली निर्माण करत असतील  तर गंभीर आहे. या विषवल्लींचा धोका देशाच्या शत्रूला नाही तर देशातल्या जनतेलाच आहे. हे लोक धर्माची भाषा बोलतात, देशभक्तीची भाषा बोलतात पण या दोन्हीही गोष्टी त्यांच्या आचरणात कधी दिसत नाहीत. धर्माच्या नेमके उलटे आचरण करणारी, धर्माचे व देशभक्तीचे अर्थ सोईने लावणारी ही मंडळी म्हणजे सामाजिक आजार आहेत. वरवरचे प्रतिकात्मक आचरण म्हणजे धर्म नव्हे. या सोंगांचा अन धर्माचा काहीही संबंध नाही. दाढ्या वाढवणे, सुंता करणे, नाही करणे, कपाळावर टिळा लावणे वगैरे वगैरे गोष्टींचा अन धर्माचा काही संबंध नाही. धर्म जगावा लागतो. धर्म कर्तव्याशी निगडीत असतो. जे कर्तव्य मानवतेला, माणुसकीला जोपासते. जितका एच.आय.व्ही चा विषाणू भयानक तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त हे धर्माध विषाणू भयानक आहेत. एच.आय.व्ही ची लागण झालेला माणूस समाजासाठी उपद्रवी होत नाही. समाजासाठी घातक ठरत नाही पण या विषवल्ली समाजासाठी घातक असतात. एच. आय. व्ही माणसाला आतून कुरतडतो. तसेच ही बांडगुळं समाजाला आतून कुरतडतात. समाजाला सापासारखे डसत राहतात. समाजातले साैख्य, स्वास्थ्य शांतता व सामंजस्य संपवतात. या मागे त्यांचे सत्ताकारण आणि अर्थकारण दडलेले असते. धर्माचा आधार घेत हे लोक भांडवली बाजारात आपले बस्तान बसवतात अन सत्तेपर्यंत पोहोचतात. संघ परिवाराने गेल्या नव्वद वर्षात हेच केले. धर्माचे नाव घेत सत्तेपर्यंत पोहोचले.  धर्माला त्यांनी सत्तेचे साधन केले. 'सत्ता' हे त्यांचे 'साध्य' आहे आणि सत्तेपर्यंत पोहोचण्याचे साधन 'धर्म' आहे. मिळालेली सत्ता अबाधित ठेवण्यासाठीच ते धर्माचे अवडंबर माजवत आहेत. म्हणूणच प्रतिकं आणि प्रतिमांचे राजकारण करत लोकांना आप-आपसात भिडवत आहेत. अग्निवेश यांना मारहाण करणार्या येड्यांना याचे भान असणार नाही हे नक्कीच.
   
     मुस्लिम समाज कासमी सारख्या प्रवृत्तीपासून लांब राहिला तर त्याचे अस्तित्व राहिल. अन्यथा विनाश अटळ आहे. मुस्लिम समाजाने धार्मिक कट्टरतेला सोडले पाहिजे. मुल्ला-माैलवींच्या धर्मांध विळख्यातून बाहेर पडले पाहिजे. काळाची पाऊलं ओळखली पाहिजेत. मध्ययुगीन मानसिकता सोडली पाहिजे. धर्माची चिकित्सा करायला शिकले पाहिजे. धर्माचे मुल्य मानवतेच्या भाषेत समजून घेतले पाहिजे. दया, क्षमा, शांती, अहिंसा आणि प्रत्येकाचा आत्मोध्दार हाच धर्माचा मुलभूत पाया असतो. या न्यायाने धर्म चिकित्सा केलीच पाहिजे. याच न्यायाने तमाम हिंदू समाजाने धर्माकडे पाहिले पाहिजे. धार्मिक कट्टरता निर्माण झाली की पहिला बळी हा धर्माचाच जातो. सर्व प्रथम धर्माचीच हत्या होते मग माणसाची होते. आजवर सुमारे १४ लाख लोकांचा बळी धर्माच्या वादात झाल्याची आकडेवारी आहे. मुल्ला-माैलवींची व भट-पुरोहीतांची दुकानं आपल्या धार्मिक अंधपणावर चालत असतात. धर्म माणसाचे जगणे सुसह्य करतो असह्य करत नाही. हिंदू समाजानेही आपले डोळे उघडले पाहिजेत. डोळ्यावरची झापडं काढली पाहिजेत. मुस्लिम आपला शत्रू असल्याचे सांगत संघ आणि त्यांची पिलावळ हिंदू धर्माचे व संस्कृतीचे तालिबानीकरण करायला निघाले आहेत. हा त्यांचा कावा आहे, हे त्यांचे षढयंत्र आहे. या लोकांना धर्माशी, रामाशी काही देणे-घेणे नाही. इथली लोकशाही उखाडून धर्माधिष्ठीत व्यवस्था निर्माण करून इथे राज्य करणे हा मुठभरांचा मनोदय आहे. त्यासाठी ते इतरांची माथी भडकावतात. इतरांना आप-आपसात लढवतात अन राज्य करतात. हिंदू धर्माचे खरे मारेकरी असतील तर हे संघवालेच असतील. या कट्टरतेनेच आजवर लाखो लोकांनी धर्म सोडला.  धर्मांधतेने मुस्लिमांचा विनाश होईलच पण हिंदूंचे तालिबानीकरण केले तर तो हिंदूंचाही होईल. याचे भान ठेवायला हवे.